जामनेर पंचायत समिती येथे आयोजन, उपस्थितीचे आवाहन
जळगांव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आपल्या दारी या. उपक्रमाअंतर्गत दि. ५ जून शुक्रवार रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत जामनेर पंचायत समिती येथे तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या तक्रार निवारण सभेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जिल्हा परिषदेशी संबंधित तक्रारी ऐकून घेण्यासाठी जिल्हा परिषद आपल्या दारी हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येतो. या अंतर्गत ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात येतात. गुरुवार दि. ५ जून रोजी जामनेर पंचायत समिती येथे ही तक्रार निवारण सभा होणार आहे. जामनेर तालुक्यातील तक्रारदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी सोडवून घ्याव्यात असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.