नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्यामुळे बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच संदर्भात आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त ट्विट केले आहे की, ‘वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा’, असे मेनका गांधी म्हणाल्या.
त्या पुढे बोलताना, ‘कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला.







