जळगाव एलसीबी पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव शहरात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी करून घरफोडीसाठी वापरलेले चारचाकी वाहन, चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात दिवसाढवळ्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. या माहितीच्या आधारे एकूण चार संशयित आरोपी कैलास चिंतामण मोरे (रा. मोहाडी, जि. धुळे), राहुल प्रभाकर अहिरे (रा. सोनगीर, जि. धुळे), जयप्रकाश यादव (रा. उत्तरप्रदेश), वीरेन ठाकूर (रा. उत्तरप्रदेश) हे निष्पन्न झाले.(केसीएन)त्यात राहुल प्रभाकर अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हा करताना वापरलेली कार आणि चोरीचा काही मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. राहुल अहिरे याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या राहुल अहिरेच्या सखोल चौकशीत त्याने सांगितले की, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी धुळे, जळगाव, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने अनेक घरफोडीचे गुन्हे केले आहेत. ही एक संघटित गुन्हेगारी टोळी असून, ते चोरी करण्यापूर्वी घरांची रेकी करत असत. (केसीएन)घरात कोणी नसल्याची खात्री करूनच चोरी करत असत आणि त्यानंतर वाहनाने पळ काढत असत. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते वारंवार त्यांचे लोकेशन आणि वाहने बदलत होते.
या संपूर्ण कारवाईमध्ये पीएसआय शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखालील हेडकॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस नाईक दीपक माळी, पोलीस शिपाई महेश पाटील, भूषण शेलार, सागर पाटील तसेच चालक हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी आणि भरत पाटील यांचा समावेश असलेले यांनी सहभाग घेतला. या टोळीच्या उर्वरित तीन सदस्यांचा शोध सध्या सुरू असून, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पथके रवाना केली आहेत. त्यांचे मोबाईल लोकेशन, नातेवाईकांचे संपर्क, सीसीटीव्ही फुटेज आणि रहदारी तपासणीच्या आधारे लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती एलसीबीकडून मिळाली आहे.