पारोळा तालुक्यातील भोंडण येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोंडण दिगर येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्या स्वतःच्या शेतात कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. २० मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरेंद्र शिवाजी पाटील (वय ४० वर्षे, रा. भोंडण ता. पारोळा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. गावात ते परिवारासह राहत होते. याबाबत जिजाबराव शिवाजी पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली.(केसीएन)दि. २० मे रोजी सकाळी नरेंद्र पाटील याने स्वतः च्या चोरवड शिवारातील शेतात उंबराच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतामध्ये ज्वारी, बाजरी, असे रब्बी पिक घेतलेले होते. सदर हंगाम अवकाळी पावसामुळे खराब झाल्यामुळे तसेच त्याच्यावर विकासोसायटीचे व हात उसनवारीचे कर्ज असल्यामुळे त्याने नैराश्यपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.