मुक्ताईनगर येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यापाऱ्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या काही बनावट नोटा आढळल्या. सोमवारी रात्री मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बँक व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील बोदवड रोडवरील स्टेट बैंक ऑफ इंडियांच्या शाखेत वीटभट्टी व्यावसायिक दुपारी २ वाजेच्या सुमारास १ लाख २० हजार रुपये भरणा करण्यासाठी आले होते. मात्र त्या व्यापाऱ्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या ७ नोटा असे एकूण ३५०० रुपये हे मशीन तपासणीत बनावट आढळले.(केसीएन)रोखपालाने ही बाब तत्काळ स्टेट बँक व्यवस्थापकास सांगितली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे ते दुसऱ्याकडून आले असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर मुक्ताईनगर शाखा स्टेट बँकेचे व्यवस्थापक कार्तिक दहीकर यांनी मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. यावरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बनावट नोटा ताब्यात बाळगणे व वापरात आणण्याचा प्रयत्न करणे यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी तसेच दोन शासकीय पंच यांच्या पथकाने बँकेमध्ये पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत.