पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्या. सध्या उष्णतेची लाट तीव्र आहे. खरीप हंगामाची मशागत करतान शेतकरी बांधवांनी शक्यतो सकाळी लवकर शेतीची कामे पूर्ण करून आरोग्याची काळजी घ्यावी. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आणि चांगल्या उगमासाठी १०० मिमी पावसाची नोंद झाल्यानंतरच १ जूननंतर पेरणी करावी. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. धुळ पेरणी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
रासायनिक खतांचा मर्यादित वापर रासायनिक खतांमुळे जमिनीत नायट्रेट्स वाढून कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जैविक खतांचा वापर वाढवावा. बोगस कंपन्यांपासून सावध राहा. अनधिकृत व फसव्या कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. बी-बियाणे, खते यांची खरेदी करताना पक्के बिल घ्यावे व ते हंगामभर जपून ठेवावे. सौर कृषी पंप योजनांचा लाभ घ्या योजना व अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती घेऊन योग्य कागदपत्रांसह अर्ज करावा. मिश्रपीक व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा. एकाच पिकावर अवलंबून न राहता शाश्वत शेतीसाठी कापसासोबत तुर, उडीद, मूग यासारखी कडधान्ये आंतरपीक म्हणून घ्या. जिल्ह्यात यावर्षी भरपूर चारा उपलब्ध असून पशुधनासाठी चाराटंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही. सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.