जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना : एकाला अटक केल्याची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव रेल्वे स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसमधून उतरताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतून २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी दि. १५ मे रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी विशाल अग्रवाल (वय ४०, रा. खंडवा, मध्यप्रदेश) हे मुलगी अवनी आणि मुलगा समर्थ यांच्यासह खंडव्याहून जळगावला येत होत्या. मुलीच्या बारावीच्या यशानिमित्त सोन्याचे टॉप घेण्यासाठी त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या बांगड्या बॅगेत ठेवल्या होत्या. जळगाव स्थानकाजवळ पोहोचताच काही चोरट्यांनी त्यांना “आमच्याकडे सामान जास्त आहे, तुम्ही आधी उतरा” असे सांगितले. रेल्वे थांबल्यानंतर लक्ष्मी अग्रवाल ह्या बॅग आणि मुलांसह उतरल्या, तेव्हा चोरटे त्यांच्या बॅगेजवळ उभे होते. खाली उतरल्यानंतर बॅग तपासली असता रोख रक्कम आणि सोन्याच्या बांगड्या गायब असल्याचे आढळले. यामध्ये ६० हजारांची रोख रक्कम आणि २५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या (किंमत २ लाख रुपये) यांचा समावेश आहे. लक्ष्मी अग्रवाल यांनी तातडीने जळगाव लोहमार्ग पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू करत मनमाड येथे एका चोरट्याला अटक केली आहे, तर अन्य तीन चोरटे फरार आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.