नागरिकांनी प्रशासनाचे मानले आभार
चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- संजय गांधी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय विधवा व दिव्यांग योजना या केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक लाभाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे आधार डीबीटी व पडताळणीचे काम रावेर तहसिल कार्यालय येथे सुरु आहे. याकरिता लाभार्थ्यांना रावेर तहसिल कार्यालयात यावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचावा या उद्देशाने उपविभागीय अधिकारी, फैजपूर व तहसिलदार यांचे मार्गदर्शनानुसार व संकल्पनेतून रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार दि.१६ रोजी मौजे खिर्डी बु मंडळात ग्रामपंचायत सभागृह, खिर्डी बु येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळातील व परिसरातील लाभार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रासह आधारकार्ड, बँक पासबुक व संबधित आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल घेवून सकाळी ०८ ते १० या वेळेत उपस्थित राहणेबाबत तहसिल कार्यालयामार्फत यापूर्वीच आवाहन करण्यात आलेले होते. याबाबत लाभार्थ्यांनी शिबिराचे ठिकाणी उपस्थित राहणेबाबत महसूलसेवक यांचेमार्फत प्रत्यक्ष लाभार्थ्यांना कळविण्यात आलेले होते. त्याप्रमाणे खिर्डी मंडळातील खिर्डी बु,बलवाडी, शिंगाडी, तांदलवाडी, गाते सजेतील गावांमधील सुमारे ३०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे इ-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
याप्रसंगी खिर्डी बु येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत नेमण्यात आलेले कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शिबिरात पंचक्रोशीतील लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.