चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बहाळ येथे काही अज्ञात माथेफिरूंनी दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, आंबा, लिंबू, मोसंबी, पपई, टमाटे, गिलके, नारळ आदी विविध फळांच्या बागा कोयत्याने कापून फेकल्याने मोठे नुकसान झाले आहे. या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बहाळ येथील शेतकरी राजेंद्र गरबड महाजन व पंकज युवराज बागुल यांचे कलमी आंबे, पदमसिंग नथू परदेशी यांची कापणीवर आलेली केळीची बाग, शिवाजी सुकलाल महाजन यांची मोसंबी, पितांबर सुकलाल महाजन यांचे वांगी, लिंबू, पपई, विठ्ठल तुळशीराम महाजन यांचे लिंबू, नारळ, खुशाल धोंडू महाजन यांची गिलके, सुदाम तुळशीराम महाजन यांची नारळ, लिंबूची बाग, इदाज अली काजी, साजिद अली काजी, निसार अली काजी यांचे लिंबू बाग, महादू यशवंत महाजन यांचे टमाटे व लिंबू बाग तर दिगंबर सुकलाल महाजन यांच्या शेतातील लिंबू व आंब्याची झाडे कापून मोठ्या प्रमाणवर नुकसान केले आहे. यासह इतर शेतकऱ्यांचाही समावेश आहे. बहाळ परिसरात फळ बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. माथेफिरुंकडून अशा प्रकारे नुकसान केले जाते. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दात्रे करीत आहेत.