राजपूत समाजाच्या मागण्यांबाबत दिले निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दीपकसिंग विजयसिंग राजपूत यांनी भारताचे संरक्षण मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. राजपूत यांनी मंत्री महोदयांचा गणपतीची मूर्ती आणि पारंपारिक शाल देऊन सन्मान केला. या भेटीत महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
यामध्ये अमरावती विमानतळाला भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाचा विशेष उल्लेख झाला. तसेच, वर्ष २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाज मेळाव्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, डॉ. राजपूत यांनी नमूद केले की, आजपर्यंत फक्त एकच मागणी पूर्ण झाली असून, उर्वरित मागण्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. या सर्व मुद्द्यांचे निवेदन डॉ. राजपूत यांनी प्रत्यक्ष सादर केले. मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदनातील सर्व मुद्दे बारकाईने वाचले आणि समजून घेतले. त्यांनी या विषयाची पडताळणी करून समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.