जळगावात माजी सैनिक प्रवीण पाटील यांचा आदर्श
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रसेवेचा वारसा हा फक्त गणवेशापुरताच मर्यादित न ठेवता, तो जीवनपद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्त करणारे माजी सैनिक प्रविण संतोष पाटील (रा. शिवराणा नगर, पिंप्राळा) यांनी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कन्या प्रियंका यांचा साखरपुडा ११ मे २०२५ रोजी पार पडला. या समारंभात आलेली भेट स्वरूपातील एकूण १ लाख २ हजार एवढी रक्कम त्यांनी संपूर्णपणे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत स्वेच्छेने देऊन राष्ट्रप्रेमाचं अनोख उदाहरण घालून दिले आहे.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या सेवेसाठी सामान्य माणसानेही काहीतरी योगदान दिले पाहिजे, या विचारातून पाटील कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या राष्ट्रभक्तीच्या कार्याची दखल घेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश प्रकाश पाटील यांनी त्यांना सन्मानपूर्वक पावती प्रदान केली. यावेळी त्यांनी नवदांपत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच, समाजातील प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार शसस्त्र सेना ध्वजदिन निधीत सढळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहन केले. या कार्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.