जळगाव जिल्हा परिषदेचा सन्मान
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे प्रशासकीय कामात गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन २०२३-२०२४ या वर्षातील गुणवंत कर्मचारी व अधिकारी यांची नावे शासनाने शुक्रवार दि.९ मे रोजी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जाहीर करण्यात आली असून जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक राजू सोनवणे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले.
ग्राम विकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच केंद्र पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. अशा काही योजना प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्यपणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. जिल्हा परिषदेत कामाचा ठसा उमटविल्याबद्दल राजू सोनवणे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदेच्या नावलौकिकात भर पडणार आहे.