एलसीबीकडून दोघांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील विविध भागातून तीन महागड्या चारचाकी वाहनांच्या चोरीची घटना ९ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी शहरातील जिल्हापेठ, रामानंदनगर व जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल गुन्ह्यात महिनाभरानंतर एलसीबीने अर्थात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून चोरीला गेलेली वाहन हि हजार किमी दूर असलेल्या राजस्थानातील वाळवंटातून जप्त केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.
चारचाकी वाहन चोरीला गेल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनकडून तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून देखील समांतर तपास सुरु होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र या प्रकरणी ठोस माहिती मिळत नव्हती.(केसीएन)पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांना त्यांच्या एका गुप्त सुत्रधाराकडून या वाहनांबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर काही मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून शहरातून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनांचे धागेदोरे राजस्थानात सांचोर, जि.जालोर असल्याचे कळले. त्यानंतर शरद बागल यांनी ३ पोलिसांना सोबत घेऊन राजस्थान गाठले.
राजस्थानातील सांचोर या ठिकाणाहून एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन संशयितांना अटक केली. त्यामध्ये सुनील केशाराम बिष्णोई (वय २५) व सुनील ओमप्रकाश बिष्णोई (वय २४, दोन्ही रा.सरनाऊ, ता.सांचोर,जि.जालोर, राजस्थान) या अटकेतील दोघांची चौकशी केली असता, त्यांच्या इतर दोन साथीदारांची माहिती मिळाली. अटकेतील दोघांना सफौ अतुल वंजारी व हरीलाल पाटील यांनी राजस्थानहून जळगावला आणले. तर उपनिरीक्षक शरद बागल मात्र त्याच ठिकाणी तळ ठोकून होते.(केसीएन)काही दिवस विरळ वस्तीच्या वालुकामय भागात पाहणी केली असता, एका जंगलात बेवारस स्थितीत एक कार आढळून आली. त्या कारचा फोटो फिर्यादीला पाठविला असता, चोरीला गेलेली कार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही कार पोलिसांनी हस्तगत करून, जळगावला पोलिसांनी स्वतः चालवत आणली आहे. इतर संशयित आरोपींचा व कारचा शोध देखील सुरु आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार हिरालाल पाटील, हवालदार विजय पाटील, चालक शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.