अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल, कृषी विभागाचा पंचनामा
रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या वादळी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार, तालुक्यातील ३१ गावांमधील तब्बल ८८४ शेतकऱ्यांच्या सुमारे ५१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत ४७ घरे पूर्णपणे किंवा अंशतः पडली आहेत, तर एक बैल जखमी झाला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी (फैजपूर) बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे आणि मंडळ अधिकारी (सावदा) धांडे यांनी रायपूर, गहुखेडे, सुदगाव शिवारात जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी यावेळी केळी बागांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान पाहिले. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जळगाव येथे पाठवण्यात आला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून, तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.