शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावून थैमान घातले आहे. यामध्ये सोसाट्याचा वारा आणि गारपिटीने शेतकऱ्याच्या पिकांचे तर नुकसान केलेच मात्र अनेक घरांची देखील नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा पूर्ण करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वारा आणि वादळ यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच चाळीसगाव तालुक्यामध्ये सोमवार व मंगळवार दोन दिवसात जोरदार पाऊस वादळ झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका, बाजरी, केळी तसेच इतर पिके मातीमोल झाली आहेत. गिरणा पट्ट्यात देवळी, आडगाव आदी गावांमध्ये तर वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कापणी केलेला मका, बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने तात्काळ नुकसानीचा पंचनामा झाला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.