जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : – जामनेर तालुक्यातील पहुर येथे राहत्या घरी लोखंडी अँगलला धरून जिन्याने खाली उतरत असताना अँगलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
फिरोज शेख तसलीम (वय २१, रा. पहूर ता.जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, एक भाऊ, बहीण यांच्यासह राहत होता. मिस्त्री काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे घरांच्या भिंती देखील ओल्या झाल्या असल्याने विद्युत प्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशातच पहूर येथे लोखंडी अँगलला धरून खाली उतरत असताना अचानक अँगलमध्ये विद्युत प्रवाह आल्यामुळे फिरोज शेख याला विजेचा जोरदार धक्का बसला व तो बाजूला फेकला गेला.
कुटुंबीयांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिथून जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. जळगाव येथे शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय पथकाने फिरोज शेख याला तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान फिरोज शेख या तरुणाच्या मृत्यूमुळे पहूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.