अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसेवा) : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत एअर स्ट्राईक केला आहे. भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. रात्री अडीच वाजता सर्जिकल स्ट्राईक झाला आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.
९ ठिकाणांवर झाला एअर स्ट्राईक
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जय हिंद असं म्हणत पोस्ट केली आहे आणि ऑपरेशन सिंदूर हा फोटो पोस्ट केला आहे. संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जलकरार स्थगित केला आहे. पाकिस्तानचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केलेत. याशिवाय भारतानं पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी संख्या देखील कमी केली आहे. भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कारवाईचं विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे.