जळगावच्या डीवायएसपी पथकाची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव शहराचे डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने दि.३ रोजी सकाळी ३ वाजेपर्यंत केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.
जळगाव शहरातील शाहूनगर मध्ये शहर पोलीस स्टेशनने टाकलेल्या धाडीमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यामधील मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी मध्ये याकुब याचे नाव समोर आले. त्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता भुसावळ येथील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली.
त्यांनी यामधील वसीम खान यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावित, शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक, रीडर गायकवाड व इतर कर्मचार्यांसह फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उपस्थित होती. तिन्ही संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.