रावेर ते वाघोडा रेल्वे स्थानकदरम्यानची घटना
रावेर (प्रतिनिधी) : – रावेर ते वाघोडा रेल्वेस्थानक दरम्यान खानापूर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे खानापूरच्या वृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोको पायलटला वाघोडा ते रावेर रेल्वेस्थानकादरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत वाघोडा स्थानक उपअधीक्षक सुमित सौरभ यांनी रावेर रेल्वेस्थानक अधीक्षक बलराम परशुराम मीना यांना खबर दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता वामन महादू इंगळे (वय ६०) यांचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. शनिवारी दुपारी १२ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यांची दोन्ही मुले मुंबईला स्थायिक आहेत. वामन इंगळे यांच्या पत्नी, दोन पश्चात मुले, सून, मुलगी, जावई, नातवंडे आहेत.