भुसावळ तालुक्यात खडके, फुलगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडके गावात राहणाऱ्या एका तरूणाच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरूवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १८ एप्रिल रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत, तालुक्यातील फुलगाव येथे ऍक्टिव्हा वाहन पेटवून नुकसान केल्याची घटना १७ एप्रिल रोजी सकाळी घडली. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
भुसावळ तालुक्यातील खडकी गावात भूषण रतिलाल चौधरी (वय २९) याचा फुल डेकोरेशनचा व्यवसाय आहे. या व्यवसायात भूषणला त्याचा मित्र दीपक उर्फ कुंदन सिंग हा काम करतो. दरम्यान गावात राहणारा पूनमसिंग विजयसिंह पाटील याने भूषण चौधरी याला दीपकला कामावरून काढून टाक असे सांगितले होते. त्यावेळी भूषणने दिपकला कामावरून काढले नाही. याचा राग आल्याने पूनमसिंग विजयसिंह पाटील (रा. खडके ता. भुसावळ) याने रागातून भूषण चौधरी याची दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीक्यू ८५५१) वर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिली. या आगीत भूषणची दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. भूषण चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार पुनमसिंग विजयसिंह पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप बडगे करीत आहे.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील फुलगाव येथे ऍक्टिव्हा वाहन पेटवून नुकसान केल्याची घटना दि. १७ एप्रिल रोजी सकाळी घडली. याप्रकरणी २ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार उर्फ तानीया अनंत बाउस्कर (वय २९) हीने होंडा कंपनीची अॅक्टीवा (क्र.एमएच १९ ईपी ६४६९) ही घराजवळ लावली असता १७ एप्रिल रोजी सकाळी ३ वाजता संशयित आरोपी निखिल हरणे व मिहिर तायडे (रा. भुसावळ) यांनी सोबत आणलेले पेट्रोल टाकून गाडी पेटवुन नुकसान केले आहे. संशयित आरोपीतांविरुध्द यापूर्वी तुषार बाऊस्कर याने भुसावळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्याचा राग आल्याने वाहन पेटविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेबाबत तानिया हिच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला हरणे व तायडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरणगाव पोलीस करीत आहेत.