धरणगाव तालुक्यात बोरखेडा येथे उपक्रम
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथील मध्यवर्ती श्री मारुती मंदिर परिसरात २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व श्री मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजाविधीने झाली.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ही प्राणप्रतिष्ठा केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि गावकऱ्यांच्या एकतेचा उत्सव आहे. अशा धार्मिक-सामाजिक उपक्रमातून संस्कृती निर्माण होते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी केले. या उपक्रमासाठी म मूलभूत सुविधा योजनेंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानिमित्त तीन दिवसीय भव्य कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. संजय धोंडगे (त्र्यंबकेश्वर), दुसऱ्या दिवशी ह.भ.प. कांचन जगताप (त्र्यंबकेश्वर) आणि समारोप ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्या आध्यात्मिक कीर्तन रसातून भक्तिभावाने पार पडले. महाप्रसादाचा लाभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने उपस्थितांना देण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक भैया मराठे यांनी तर आभारप्रदर्शन उपसरपंच नितीन पाटील यांनी केले. याप्रसंगी सरपंच उषाबाई मराठे, ग्रामपंचायत सदस्य महेश मराठे, दीपक पाटील, किशोर शेडगे, बापू पवार, गोकुळ पाटील, किशोर मराठे, पिंटू पाटील, किशोर तोंडे, शाखा प्रमुख सुदाम मराठे यांची उपस्थिती होती. बोरगाव बुद्रुक व बोरगाव खुर्द येथील भजनी मंडळाच्या सुरेल भजनांनी सोहळ्याच्या भक्तिरसात रंग भरले.