पारोळा तालुक्यात सबगव्हाण टोलनाक्यावरील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : सबगव्हाण टोल नाक्यावर रावेर ते ठाणे बस जात असताना फास्टटॅग स्कॅनिंग न होण्याच्या कारणावरून बस वाहकास टोल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी चार ते पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर ते ठाणे ही बस सबगव्हाण टोल नाक्यावर पोहचली. यावेळी फास्टटॅग स्कॅनिंग होऊ शकले नाही. तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यावरून वाहक जितेंद्र कल्याण बोरसे (रा. म्हसवे ता. पारोळा) व टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोघामध्ये हमरातुमरी झाली. यानंतर देवीदास सोमा सैंदाने यांच्यासह इतर चार ते पाच जणांनी वाहक जितेंद्र बोरसे यांना टोलच्या मागे नेत बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले आहेत. शेवटी इतर टोल कर्मचारी व प्रवाशांनी हा वाद मिटविला. याप्रकरणी वाहक जितेंद्र बोरसे यांनी पोलिसांना माहिती दिली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.