शुभारंभाला २१०० रुपये प्रतिक्विंटलने झाले लिलाव
चाळीसगाव (प्रतिनिधी) : मेहुणबारेसह या परिसरातील १५ ते २० गावांमधील शेतकऱ्यांसाठी मेहुणबारे येथे गुरुवारी हंगामी उपबाजार सुरू करण्यात आला. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची सुविधा होणार असून, १५ जूनपर्यंत शेतमाल खरेदी केली जाणार आहे. पिलखोड येथेही शुक्रवारी याच स्वरुपाचा उपबाजार सुरू केला जात आहे. हे दोन्ही उपबाजार सुरू करण्याचा निर्णय चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
मेहुणबारे येथे भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन रमेश गोविंदा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रथम आलेल्या वाहनांचे पूजन करून शेतमालधारक शेतकरी बांधवांचा सत्कार करून लिलावाचा प्रारंभकरण्यात आला. मेहुणबारे येथे उपबाजाराचा प्रारंभ झाल्यानंतर विक्रीसाठी आलेल्या मक्याचा लिलाव करण्यात आला. २१०० रुपये प्रतिक्विंटल मका तर २२०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारी असे लिलाव पुकारले गेले. उपबाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती मच्छिंद्र राठोड, गिरणा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब देशमुख, बाजार समितीचे संचालक रवींद्र चुडामण पाटील, दिनेश पाटील, कपिल पाटील, प्रदीप पाटील, नवल पवार, शैलेंद्र पाटील, सरदारसिंह राजपूत, पप्पू वाणी, सरपंच रवींद्र साळुंखे, राजू शेठ, आप्पा महाजन, सचिव जगदीश लोधे, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, तसेच परवानाधारक खरेदीदार व्यापारी व शेतकरी बांधव प्रमाणावर उपस्थित होते.