चाळीसगाव शहरात घडली होती घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : घरी दाढी-कटिंग करण्यासाठी आलेल्या व्यक्तीनेच वृद्धांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची चेन चोरून नेल्याचा प्रकार शहरात घडला होता. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला असता सहा महिन्यांनी चोरटा हाती लागला. संशयितास अटक करून त्याच्याकडून चोरीची चेन जप्त करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहरातील साने गुरुजी नगरमधील रहिवासी चंपालाल जगन्नाथ मेहता यांनी त्यांच्या वडिलांची दाढी कटिंग करण्यासाठी नीलेश सैंदाणे यास त्यांच्या घरी बोलावले होते. तेव्हा सैंदाणे याने मेहता यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. हा चोरीचा प्रकार २० ऑक्टोबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला होता.
याप्रकरणी मेहता यांच्या फिर्यादीवरून नीलेश सैंदाणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले, पोना. नितीन अगोणे, पोकॉ विजय पाटील, नीलेश पाटील, समाधान पाटील यांनी केला.
संशयित आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सैंदाणे याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली. ताब्यात घेतलेला चोरटा नीलेश सैंदाणे याने आणखी कुठे चोरी केली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.