जळगाव शहरातील कालिकामाता मंदिर परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जेवण झाल्यानंतर गल्लीतील महिलेसोबत रस्त्याने चालत असताना मागून येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे ४८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना का. ऊ. कोल्हे विद्यालय परिसरात घडली. याप्रकरणी शनि पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मनीषा विनोद बारी (वय ४६, रा. जुना खेडी रोड, जळगाव) या व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या उषा पुंडलिक देवरे हे ३ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता का. ऊ. कोल्हे विद्यालयाच्या मागील गेटच्या जुना खेडी रस्त्याने चालत असताना मागून अनोळखी व्यक्ती चालत आला. काही कळण्याच्या आतच त्याने गळ्यातील मंगळसूत्र तोडले आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
मनीषा बारी यांनी तक्रार दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कालिका माता मंदिर परिसरामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना यापूर्वी देखील घडल्या असून पोलिसांनी वचक ठेवावा अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.