पाणी फाउंडेशनतर्फे शेतकरी गटांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) : अत्याधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत खराब होतेच, शिवाय याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात शुक्रवार दि. ४ रोजी आयोजित पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप बक्षीस वितरण कार्यक्रमात करनवाल बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे तसेच गटशेती करणाऱ्या महिलांचे समूह उपस्थित होते. करनवाल यांनी सांगितले की, “शेती ही निसर्गावर आधारित असून त्यात अनेक धोके असतात. तरीही शेतकऱ्यांनी नवकल्पना स्वीकारून शेतीत नवे प्रयोग करावेत. आज पाणी ही संपणारी गोष्ट आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर, साठवणूक आणि जमिनीत रुजवणूक आवश्यक आहे.”
जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘मिशन संजीवनी’ या उपक्रमांतर्गत ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम राबवले जाणार असून, त्यात पुढाकार घेणाऱ्या शेतकरी गटांना वॉटर कपच्या धर्तीवर बक्षीस देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात धरती माता शेतकरी गट, रोटवद शेतकरी गट, शंभू महिला शेतकरी गट, गायत्री महिला शेतकरी गट यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.