जळगावात छ. शिवाजी नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्यात वीट मारुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळी एस.के. ऑईल मिल जवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील भारत नगरात राहणारा दीपक सोनार हा ३१ मार्च रोजी सायंकाळी त्याच्या मित्रांसह राहत होता. त्यावेळी रिक्षातून राहुल उर्फ घाऱ्या भगत, विक्की शेठ, बंटी बनसोडे, मिलींद यांच्यासह अन्य तीन जण त्याठिकाणी आले. त्यावेळी राहुल उर्फ घाऱ्या याला दीपक याने माझ्या मामासोबत वाद का घातला याबाबत विचारले. त्याचा राग आल्याने राहुल उर्फ घाऱ्या भगत याच्यासह त्याच्यासोबत असलेल्यांनी दीपक सोनार याला मारहाण केली. या मारहाणीत घाऱ्याने त्याठिकाणी पडलेली विट दीपकच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. यावेळी फैजल खान याने दीपकला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन राहुल उर्फ घाऱ्या अर्जुन भगत, विक्की शेठ, बंटी बनसोडे, मिलींद (पुर्ण नाव माहिती नाही) याच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.