जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील घटना
जळगांव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील ० ते ३ वर्ष वयोगटातील अंगणवाडीच्या बालकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदुळाची परस्पर विक्री करीत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. त्यामुळे विक्री झालेला तांदुळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून फत्तेपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती तोताराम भिसे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती संतुकराव कदम यांचेसह फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.देऊळगावगुजरी येथील अंगणवाडी सेविका लताबाई रामचंद्र मोरे व मदतनिस ज्योती अनिल माळी या दोघींनी संगनमत करून भरदुपारी अंगणवाडी शालेय पोषण आहाराचा ११२ किलो तांदूळ किंमत २ हजार ४६४ रुपये फत्तेपूर येथील साहिल नबा कुरेशी व जुबेर रहिम कुरेशी या दोघांना विक्री केला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून मुद्देमालासह तांदुळ खरेदी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांनी मदतनिस व सेविका यांनी तांदूळ विकल्याची कबूली दिली. याबाबत स.पो.निरीक्षक गणेश फड यांनी गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्याशी संपर्क साधला. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी भारती भिसे व पर्यवेक्षिका ज्योती कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स.पो.नि.गणेश फड यांचे मार्गदर्शनात हेड कॉ . प्रविण चौधरी, गनी तडवी करीत आहे.