चोपडा तालुक्यातील लासुर रस्त्यावर कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लासुर ते चौगाव रस्त्यावर अंगात पोलिसांचा सरकारी गणवेश परिधान करून बनावट ओळखपत्र तयार करत पोलीस असल्याचे भासवून तोतयागिरी करत फिरताना आढळून आल्यामुळे २४ वर्षीय तरुणावर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन किरण डामे (वय २४, रा. वरळी ता. चोपडा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. चोपडा तालुक्यातील लासुर गावच्या हद्दीत लासुर ते चौगाव रोडवर बुधवार दि. १२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पवन डामे हा अंगात सरकारी पोलिसांचा गणवेश घालून ओळखपत्र तयार करत पोलीस असल्याचे ग्रामस्थांना भासवत होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे कॉन्स्टेबल विशाल राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पवन डांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे