बालरंगभूमी परिषद, गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंतांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आज दि.७ रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संचलित महादेव हॉस्पिटल, जुने गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी १० वाजता गोदावरी फाऊंडेशन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.रिषभ पाटील व समन्वयक रत्नकिशोर जैन, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्या हस्ते नटराज पूजन करुन शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.
या शिबिरात शहरातील ४५ कलावंतांनी सहभाग घेतला होता. या कलावंतांची इसीजी, रक्तातील शुगर, ब्लडप्रेशर व टूडी इको हृदयतपासणी करण्यात आली. यापैकी २ कलावंतांना पुढील अधिक तपासण्या व उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बालरंगभूमी परिषदेतर्फे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाबद्दल नृत्य, नाट्य, संगीत तसेच लोककला कलावंतांतर्फे परिषदेचे आभार मानण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेची कार्यकारिणी, पदाधिकारी सदस्य सुदर्शन पाटील, मोहित पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, पंकज बारी व गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.