अमळनेर शहरात लग्नसमारंभात चोरट्यांचा धुमाकूळ
अमळनेर (प्रतिनिधी) – शहरात चोरट्यांनी आता लग्न समारंभ टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. नवरदेवाच्या आईच्या पर्स मधून सुनेचे सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास झाल्याची घटना दिनांक २ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बन्सीलाल पॅलेस मध्ये घडली या प्रकरणी अमळनेर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबेपुरा येथील हनुमान मंदिराजवळील रहिवासी प्रल्हाद भावसार व लता भावसार यांच्या तुषार नावाच्या मुलाचे लग्न २ मार्च रोजी बन्सीलाल पॅलेस मध्ये होते. लता भावसार यांनी त्यांच्या सुनेसाठी १ लाख ८६ हजार ७६४ रुपयांचे २३.६८० ग्राम सोन्याची पोत आणि ३३ हजार ९१४ रुपयांचे ४.३०० ग्राम पेंडल हे पर्स मध्ये ठेवले होते. नातेवाईक जेष्ठ महिलांचे पाय पडण्यासाठी लता भावसार पर्स हॉल मध्ये बाजूला ठेवून गेल्या.
तिकडून परत आल्यावर त्यांना पर्स उघडी दिसली. पर्स मधील २ लाख २० हजार ६७८ रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. लता भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.