यावल शहरातील पूर्णवाद नगरातील घटना
यावल (प्रतिनिधी) : शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या पूर्णवाद नगरात घरफोडी करुन अज्ञात चोरट्याने घरातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ३ लाख दोन हजारांचा मुद्देमाल लांबवला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरात फैजपूर रस्त्यावरील पूर्णवाद नगरात पंकज अमृत बारी हे राहतात. सोमवारी बारी हे चहाच्या दुकानावर गेले होते. दरम्यान, त्यांची आई या भागात सुरू असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घरात प्रवेश
केला तसेच घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली १ लाख १२ हजाराची रोख रक्कम आणि १ लाख ९० हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ३ लाख २ हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार वासुदेव मराठे करत आहेत.









