चाळीसगावात शासकीय निवासी शाळेतील पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात
चाळीसगाव (प्रतिनिधी) : – शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असून येणाऱ्या काळात निश्चितच विविध क्षेत्रांमध्ये हे विद्यार्थी यश संपादन करतील, असा आशावाद चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
चाळीसगाव येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत १४ फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण व इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात ते विद्यार्थ्यांना मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आ. मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी व त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्यात. या वेळी शाळेतील विविध उपक्रमांचे आ. चव्हाण यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. शाळेतील नव्याने स्थापित करण्यात आलेल्या अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटनही या वेळी आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे आंचलिक प्रबंधक प्रवीणकुमार सिंह, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई, समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेचे विशेष अधिकारी राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापिका सोनाली महाजन, गृहपाल लक्ष्मीकांत कोठावदे हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनाली महाजन यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप परदेशी यांनी, तर महेंद्र कुमावत यांनी आभार व्यक्त केलेत. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.