चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- १०० क्विंटल कापसाच्या चोरी प्रकरणातील आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल सोमवारी जप्त करण्यात आला आहे. दीपक नामदेव बागुल (रा. विद्यानगर, नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी प्रशांत सुधाकर गोल्हार (रा. खरजई नाका) यांनी दि. २१ रोजी चाळीसगाव शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. गोल्हार यांनी १०० क्विंटल कापूस दि. २१ रोजी मालवाहू वाहन क्रमांक (एम.एच.४१ ए.यू. ५९५४) वरील चालकाकडे पातोंडा येथून दिला होता. त्याची किंमत ७ लाख रुपये होती. संशयित आरोपीने लावलेली ही नंबर प्लेट बनावट होती. संशयित आरोपीने गुन्ह्याच्या वेळी वापरलेला मोबाइल चोरीचा होता. तसेच ७ लाख रुपयांचा कापूस चोरीला गेला होता.
संशयित आरोपीने मोबाइल गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकून दिला होता. अखेर पोलिसांनी तपास केला व संशयित आरोपी दीपक नामदेव बागुल (३५, धंदा चालक, रा. विद्यानगर हौ.सो. ओ ३/२८ धात्रक फाटा, नाशिक) याचा सहभाग निष्पन्न झाले. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताने माल घेताना वापरलेली नंबरप्लेट आणि विकताना वापरलेली नंबरप्लेट हीदेखील वेगळी असल्याचे समोर आले. त्याने हा माल सिल्लोड येथे विकला होता.पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक योगेश माळी, अमोल भोसले, नीलेश पाटील, गणेश कुवर, गौरव पाटील यांनी पाहणी केली.