जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील योगेश्वर नगरातील विवाहितेची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत ५१ हजार १५० रूपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी विवाहितेच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील योगेश्वर नगरात कांचन आसाराम मासरे ( वय – २९ ) या विवाहिता राहायला आहे. २७ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास विवाहितेच्या मोबाईलवरून अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोनवर बोलणारी व्यक्तीने आपल्याला २५ हजार रूपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. परंतु हे खोटे असल्याचे समजत विवाहितेने फोन कट केला. मात्र पुन्हा दुसऱ्या अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावेळी समोरील अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमच्या व्हाट्सअपवर त्यांच्या कंपनीचे पॉंप्लेट टाकले असून त्यावर केबीसी असे नाव सांगितल्याने विवाहितेचा विश्वास बसला. त्यामुळे समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे विवाहितेने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार एकुण ५१ हजार १५० रूपये ऑनलाईन टाकले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी शनीपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.