जळगाव (प्रतिनिधी) – डॉ.रविंद्र टोणगावकर, दोंडाईचा यांचे नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते, मार्गदर्शक व माजी राज्य उपाध्यक्ष, उत्तम लेखक, शल्यचिकित्सक डॉ.रविंद्र टोणगावकर नाना यांना महा अंनिस जळगाव जिल्ह्याच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
फसव्या वैद्यकीय उपचार पद्धतीवर त्यांनी सतत आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी लेखन,परिषदा घेतल्या.सोज्वळ,शांत स्वभाव, जगण्यातील साधेपणा तसेच दातृत्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरले होते.


एखाद्या जिल्हा रुग्णालय एवढी गर्दी त्यांच्या दवाखान्यात असायची.रात्रीचे दोन वाजेपर्यंत त्यांचा ओपीडी असायचा.ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्जन संघटनेचे नाना जागतिक पातळीवर अध्यक्ष होते.त्या निमित्ताने त्यांचे देश-विदेशात भ्रमंती होत असे.
नानांनी हार्निया आजारावर ऑपरेशनसाठी लागणारी जाळीची किंमत रुपये दीड हजार ते दहा हजार इतकी होती..त्यावर संशोधन करून स्वत:ची
टोणगावकर मेष या नावाची हार्नीया जाळी शोधली. या जाळीची किंमत फक्त पन्नास पैसे ते दोन रुपये इतकी कमी झाल्याने रुग्णांकडून जाळीची किंमत घेतली जात नाही. त्यांच्या या संशोधनाची जागतिक आरोग्य परिषदेने प्रथम क्रमांक देऊन सन्मान केला.जगभरातील अठ्ठावीस देशात या स्वस्त जाळीचा वापर होत आहे.
देव न मानणारा देवमाणूस
या विश्वात न आत्मा आहे ना देव आहे, या विचारावर टोणगावकर नाना ठाम राहिले.माझी अध्यात्मिक वाटचाल, दोंडाईच्याचा डाॅक्टर ही पुस्तके महाराष्ट्भर खूप मोठ्या प्रमाणात वाचले जातात.जनजागृतीचे मोठं काम उभं करणाऱ्या या शल्यचिकित्सकाची आनंदी समाधानी वाटचाल आम्हा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार!







