मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी कृषी क्षेत्रासाठीही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

बळीराजा जलसिंचन प्रकल्पांतर्गत 91 प्रकल्पांची कामं करण्यात आली आहे. राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरू करण्यात आली आहे तर या 26 सिंचन प्रकल्पात 21,698 कोटींच्या निधीची तरदूत अर्थसंकल्पात केली आहे. गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटलं असून 3 लाख रूपयांपर्यंतचं पीक कर्ज शून्य टक्के दरानं देण्यात येणार आहे.
कृषी पंप जोडणी धोरण राबवणार आहेत तर कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार असून 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. तर शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून दिलं असून 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी करणार असल्याचंही राज्याच्या 2021च्या अर्थसंकल्पात सांगितलं आहे. मात्र या अर्थसंकल्पाला विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.







