चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडा येथील घटना
एका दिवसात हत्येच्या दोन घटना उघड
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात एका दिवसात दोन खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री चिंचखेडा शिवारात वृद्धाचा लाकडी दांडक्याने मारून निर्घृण खून करण्यात आला असून दुपारी तरुण फकिराचा खून झाला आहे. चिंचखेडा शिवारात शेतकऱ्याच्या डोक्यात मध्यरात्री लाकडी दांडक्याने मारून खून केला आहे. मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश राजेंद्र पाटील (वय २३, रा. देवळी ता. चाळीसगाव) फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील राजेंद्र सुकदेव पाटील यांचा अज्ञात व्यक्तींनी खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाटील कुटुंब गावातील विमलबाई रामलाल पाटील यांची चिंचखेडे शिवारातील शेत जमिन निमबटाईने सुमारे ७ वर्षापासुन करीत आहेत. शेतात कांद्याचे पत्र्याचे शेड असुन तेथे गुरे असल्यामुळे राजेद्र सुकदेव पाटील हे नेहमी रात्री झोपायला जात असे. दि.७ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता राजेद्र पाटील हे शेतात झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचा दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जीवे ठार केले. दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावचे दिलीप दत्तु पाटील यांनी पाटील परिवाराला याबाबत माहिती दिली.
नागरिकांनी गावातील पोलीस पाटील यांना त्याच्या मोबाईलवर फोन करुन घटनेबाबत माहीती दिली. घटनास्थळी दोरी, रक्ताने माखलेला लाकडी दांडा आहे. मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. तपास पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत.