युके (वृत्तसंस्था) – कोव्हिड 19 साठीची लसीकरण मोहीम आजपासून युकेमध्ये सुरू झाली आणि 90 वर्षांच्या आजींना फायझरच्या लशीचा डोस सर्वांत पहिल्यांदा देण्यात आलाय.

मार्गारेट कीनन या पुढच्या आठवड्यात त्यांचा 91वा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि ही आपल्याला मिळालेली वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय.
कॉव्हेंटरी मधल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये युकेतल्या वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना इंजेक्शन देण्यात आलं. येत्या काही आठवड्यांमध्ये आता युकेमध्ये फायझर – बायोएनटेकच्या लशीचे पहिल्या टप्प्यातले 8 लाख डोसेस देण्यात येणार आहेत.
या महिनाअखेरपर्यंत आणखी 40 लाख डोसेस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
युकेमधल्या 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना – ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्यात येईल.
लशीचा पहिला डोस घेणाऱ्या मार्गारेट कीनन म्हणाल्या, “कोव्हिड 19 विरोधातली पहिली लस मला देण्यात आल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हे सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट आहे. वर्षातला बहुतेक काळ एकटीने घालवल्यानंतर आता या लशीमुळे नवीन वर्षात मी माझ्या कुटुंब आणि आप्तांसोबत वेळ घालवू शकेन. ज्यांना ही लस देऊ करण्यात येतेय, त्यांना मी एकच सांगिन – जर मी 90व्या वर्षी लस घेऊ शकते, तर तुम्हीही ती घेऊ शकता. ”
नियामकांकडून फायझरच्या लशीला गेल्या आठवड्यात मान्यता मिळाल्यानंतर त्या लशीचा सार्वजनिक वापर सुरू करणारा युके हा जगातला पहिला देश आहे.
युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितलं, “आपल्याला खूप मोठा पल्ला अजून गाठायचा असला तरी यासाठीची सुरुवात आज झाली आहे.”
मार्गारेट कीनन यांना इंजेक्शन घेताना पाहणं आपल्यासाठी रोमांचक आणि आनंदाचं होतं, असं सांगत ते म्हणाले, “हा विषाणू भीषण आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येत नियमांचं पालन करायला हवं.”
ही लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे आणि स्वयंसेवकांचे युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आभार मानले आहेत. नियमांचं पालन करत इतरांचंही संरक्षण करणाऱ्या सगळ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
युकेमध्ये सुरू झालेली ही लसीकरण मोहीम प्रत्येकासाठी बंधनकारक नाही.
येत्या काही आठवड्यांत देण्यासाठी युके सरकारने फायझर – बायोएनटेककडून सुमारे 8 लाख डोसेस घेतले आहेत. आणि अजून 4 कोटी डोसेसची ऑर्डर देण्यात आलेली आहे.
संपूर्ण रोग प्रतिकारशक्तीसाठी लशीचे 2 डोसेस घेणं गरजेचं असल्याने या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना लस देण्यात येईल.
या एकूण ऑर्डरपैकी या महिनाअखेरपर्यंत 40 लाख डोसेस कंपनीकडून उपलब्ध होतील.
तर येत्या काही आठवड्यात ऑक्सफर्ड – अॅस्ट्राझेनकाच्या लशीलाही मान्यता मिळण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचं मॅट हॅनकॉक यांनी म्हटलंय.







