जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका ठिकाणी पाळीव कुत्रा बसलेला असताना त्याच्या जवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरवल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख सलीम शेख निजाम (वय-५२), रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव हे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने सलीम हा शुक्रवार ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आलेले होते. यावेळी ते दुचाकीवरून जात असताना पाळीव कुत्रा घाबरून पळून गेला. या कारणावरून आशिष संजय सोनवणे व त्याच्यासोबत असलेले इतर तीन जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेबाबत शेख सलीम शेख निजाम यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.