पुणे (वृत्तसंस्था) – कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाही विना मास्क भटकंती करणाऱ्याचे पेव फुटले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील चार दिवसांत तब्बल 11 हजार 150 विनामास्क नागरिकांकडून 55 लाख 74 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी विनामास्क फिरु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांकडून सोशल डिस्टन्स न पाळणे, विनामास्क भटकंती करणे, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना संक्रमित रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर पालकमंत्र्याच्या बैठकीत विनामास्क नागरिकांवर कडक कारवाई करुन दंडवसुलीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 2 सप्टेंबरपासून पोलिसांकडून शहरातील विविध भागात कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. चौका-चौकातील सिग्नलवर विनामास्क वाहनचालकांना थांबवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विमानास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून हद्दीतील नाकाबंदीत कडकपणे अमंलबजावणी केली जात आहे. मागील चार दिवसांत तब्बल 11 हजार 150 बेशिस्त नागरिकांनी मास्क न घातल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनलॉकनंतर बेशिस्तांकडून सर्रासपणे आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
मास्क गळ्यात नव्हे नाकाला लावा
शहरातील विविध भागातील नागरिकांकडून पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी दिखाउपणे मास्कचा वापर केला जात आहे. मास्कचा वापर तोंडाला न करता गळ्यात घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधिताविरुद्धही कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ मास्कचा वापर केला पाहिजे. दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क न दिसल्यास कारवाई करण्याचाही इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनी मास्क वापरुन सामाजिक बांधिलता जपण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. विनामास्क भटकंती कोरोनाच्या संक्रमणाला गती देत आहे. त्यामुळे स्वयंशिस्त बाळगून सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. विनामास्क फिरणाऱ्याविरुद्ध प्रत्येक चौकात पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मास्क वापराबाबत स्वयंशिस्त आणि महानगरपालिका व पोलिसांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देणे महत्वाचे असल्याचे बच्चन सिंह ( पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा) यांनी सांगितले.