पुणे (वृत्तसंस्था) – रिक्षात सिगारेट ओढत बसू नको, असे सांगितल्याच्या रागातून तिघांनी मिळून तरुणावर तलवारीने वार केला. ही घटना धानोरीतील गोकुळनगरमध्ये घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विकास उर्फ लखन आल्हाट (वय 24) आणि आकाश खोडे (वय 22, रा. गोकुळनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन काटे (वय 25, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि आरोपी एकाच परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी आकाश सचिनच्या रिक्षामध्ये बसून सिगारेट ओढत होता. त्यामुळे सचिनने त्याला पुन्हा रिक्षात बसायचे नाही, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आकाशने दोघा साथीदाराच्या मदतीने सचिनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन तलवारीने वार केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निकम अधिक तपास करीत आहेत.