जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जगवाणी नगर परिसरातील शांतीवन कॉलनीत पिता – पुत्रांना शुक्रवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री किरकोळ कारणावरून मारहाण करीत जखमी केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अविनाश बन्सी पाटील यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास तक्रारदार यांचा मुलगा राहुल पाटील याच्याशी योगेश देशमुख हा वाद घालत होता. तू ठिबकचा धंदा का सुरु केला ? तू माझे गिऱ्हाईक तोडत आहे, असे म्हणत योगेश देशमुख याने राहुल पाटील याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागला. यावेळी तक्रारदार अविनाश पाटील हे मुलाला वाचवायला मध्ये आले असता, त्यांनाही शिवीगाळ करून योगेश देशमुख याने डाव्या बाजूला दगड मारून तर योगेशच्या सोबत असलेला विकी माली याने अविनाश पाटील यांच्या डाव्या हातावर व डोक्यात स्टीलचा रॉड मारून दुखापत केली.
यानंतर अविनाश पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी देवकर कॉलेजच्या आवारातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश देशमुख व विकी माळी यांना अटक करण्यात आली आहे.








