जळगावाच्या मेहरूण तलाव परिसरातील घटना, वॉचमनला अटक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात मोबाईल चोरीचे सत्र सुरुच असून, रविवारी दि. १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या मैत्रिणींचे सात मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीतेजा अशोक मिंडे (वय २१,रा.लोकेश्वरम, तेलंगणा, ह.मु.साईगीता नगर, जळगाव) ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी जळगावला आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत राहत आहे. रविवारची सुट्टी असल्याने मित्र व मैत्रिणींसोबत शहरातील मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेल्या असताना, सायंकाळी ७ वाजेच्या सूमारास गणेशघाट परिसरातून नवीतेजा मिंडेसह मैत्रिणींचे एकूण ८१ हजार किंमतीचे सात मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या परीसरात काम करणाऱ्या एका वॉचमनने मोबाईल चोरी केले आहे. त्यानुसार संशयिता आरोपी अनिल रघुनाथ चव्हाण (वय ३४ रा रोटवद् तांडा ता.जामनेर जि.जळगाव) यास ताब्यात घेवुन त्याची विचारपुस करता त्यानेच ७ मोबाईल फोन हे चोरी केल्याची कबुली दिली. त्यास दि.१६ रोजी अटक करुन त्याचेकडुन ७ मोबाईल फोन हे हस्तगत केले आहे.