चाळीसगाव (प्रतिनिधी) – घराचा दरवाजा उघडा दिसताच आत शिरलेल्या चोरांनी संधी साधत सोन्याच्या चार तोळ्याच्या दागिन्यांसह रोख आणि मोबाईल लांबवीत १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास चाळीसगावातील भडगाव रोडवर असलेल्या संत रोहिदास सोसायटीत घडली.
भडगाव रोडवरील कापड मिलसमोर मोकळे मैदान आहे. या मैदानाजवळ सुनील राधो बोरसे (५१, रा. संत रोहिदास सोसायटी) यांचे दुमजली घर आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची आई बाथरुममध्ये गेली होती. त्यामुळे घराचा पाठीमागील दरवाजा उघडाच होता. मैदानातून आलेल्या चोरांनी आसपासची चार घरे देखील फोडण्याचा प्रयत्न केला. पहाटे बोरसे यांच्या घरात उजेड दिसल्यामुळे चोरटे आत शिरले. जिन्याने वरच्या खोलीत गेलेल्या चोरांनी कपाटातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्याचा सोन्याचा हार, खोलीतील आठ हजाराचा मोबाईल आणि पाच हजाराची रोख असा ऐवज लांबवला. अवघ्या काही मिनिटात चोरटे पसार झाल्यानंतर बोरसे यांच्या आईने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर बोरसे यांनी वरच्या मजल्यावरील खोलीत धाव घेत पाहणी केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर चाळीसगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत.