धानोरा, ता.चोपडा (प्रतिनिधी) – शेतकरी आरक्षण क्रांती संघटनेची नुकतीच राज्य संघटना स्थापना करण्यात आली आहे.या संघटनेचे जळगाव जिल्ह्याचे प्रथम अध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील यांची राज्याअध्यक्ष संतोष सपकाळे यांनी नुकतीच चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत निवड केली तर चोपडा तालुका अध्यक्ष म्हणून राजेंद्र चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्रात आरक्षण मिळावे म्हणून असंख्य जाती धर्माचे लोक आरक्षण मागत आहेत. पण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो शेतकरी हीच त्याची जात माणुन प्रत्येक शेतकरी व त्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांवर शासनाकडून होणारा अन्याय, शेतकऱ्यांना समोर असलेल्या असंख्य अडचणी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी तसेच कर्जमाफी,विजेची समस्या,सोडवून न्याय मिळावा हा शेतकऱ्यांचा हक्क असुन तो मिळालाच हवा हा उद्देश ठेवत कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता शेतकरी हितासाठी संतोष सपकाळे यांनी शेतकरी आरक्षण क्रांती संघटना ही अधिकृत नोंदणीकृत संघटना स्थापन केली आहे.तिचे जाळे लवकरच राज्यभर पसवून शेतकरी आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले जाणार आहे. या संघटनेने जळगाव जिल्ह्याचे प्रथम अध्यक्ष म्हणून संस्थापक सदस्य असलेले रावसाहेब शिवराम पाटील यांची राज्य अध्यक्ष संतोष सपकाळे यांनी नियुक्ती पत्र देवून निवड केली.तर चोपडा तालुका अध्यक्ष म्हणून राजेंद्र चौधरी यांची जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी राज्याअध्यक्षांच्याच उपस्थितीत निवड केली.यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सदर निवडीचे रावसाहेब पाटील व राजेंद्र चौधरी यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.