रत्नागिरी (वृत्तसंस्था) – नारायण राणे आणि शिवसेना यांचायतील राजकीय वितुष्ट हे सर्वज्ञात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाकरता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येत आहेत. त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, या अगोदर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची चर्चाच सर्वत्र होत होती. यावर आता खुद्द नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचे शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते. 11 जानेवारी रोजी राऊत यांनी याबाबतचे वक्तव्य केले होते. यावर विचारले असता नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा काहीही संबंध हा राज्याशी येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला नव्हता. विनायक राऊत यांच्या बोलण्यात किंवा दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे राणे यांनी म्हटले होते.







