मुंबई (वृत्तसंस्था) – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रणावत’ आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे टीकेची धनी ठरली आहे. कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यावरून अनेकांनी कंगनाला सुनावलं आहे. तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे. अशातच आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून कंगनानं घेतलेल्या भूमिकेवर मुंबई पोलीस व मुंबईविषयी बाबत भाष्य केलं आहे.
सामना अग्रलेख
‘विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात?
मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे.