मुंबई (वृत्तसंस्था) – राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झाले आहे. परंतु, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारांच्या प्रवेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी चर्चा होणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांसह कामकाज सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी विधिमंडळ प्रवेशद्वारजवळ कालपासून चाचण्यांच्या व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, स्वॅब घेऊनही काही आमदारांना रिपोर्ट न दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
टेस्ट करून २४ तास झाले पण रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनात जाता येत नाही, या सरकारने काही एजंट ठेवले का? रिपोर्ट मिळेल का?, असा सवाल करत माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत सेनेच्या आमदारांनीही आपली अडचण बोलून दाखवली. हरिभाऊ बागडे यांनी हा प्रकार अजित पवार यांना सांगितला.
त्यानंतर विधिमंडळाच्या गेटवरच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. असे कसे काम चालणार आहे, आमदारांचे रिपोर्ट दिले नाहीतर ते आतमध्ये जातील कसे? ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी झालेले रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा, असा आदेश अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. यामुळे सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आले.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याने ते कामकाजात सहभागी होणार नाहीत. करोनामुळे अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सरकारकडून दिला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.