अहमदाबाद (वृत्तसंस्था) – गुजरातमधील अहमदाबादच्या एका कोविड-19 हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आठ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली. स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपास 40 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हे सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,’अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने दु:खी झालो आहे. मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना. या घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून घटनेतील लोकांना यथासंभव मदत केली जात आहे.’
अहमदाबादमधील नवरंगपुरा परिसरातील श्रेय हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. दवाखान्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह 40 अन्य रुग्णांना वाचवलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.







